- पण… चंद्रकांत पाटीलांचे शाईफेकीवर विरोधकांना प्रत्युत्तर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२२) :- मी चळवळीतला माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. अशा प्रकारे परचा कावळा करणं, योग्य नाही. मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यावर तीनवेळा स्पष्टीकरणही दिलं आहे. तरीही अशाप्रकारे भ्याडपणे माझ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मी माझं पोलीस संरक्षण काढून कार्यक्रमाला जायला तयार आहे, हिंमत असेल तर समोर या”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
“अशा गोष्टींमुळे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तडा देतो आहे. सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळले. मात्र, आता महाराष्ट्रात झुंडशाही सुरू आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही” , असेही ते म्हणाले.
“आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सुट दिली तर काय होईल? पण ही आमचा संस्कृती नाही. शब्दाला शब्दानेही उत्तरं देता येतात. माझ्या विधानानंतर मी लगेच स्पष्टीकरण दिले होते. मुळात एका गिरणी कामगाराचा मुलगा या पदापर्यंत पोहोचणे, हे सरंजामशीवाल्यांना झेपत नाही. त्यामुळे असे भ्याड हल्ले सुरू आहेत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.


















