- माजी निवृत्त पोलीस उप अधिक्षक अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन..
- उन्नती सोशल फाउंडेशन आणि ऑप्शन डेल्टा क्लबच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२२) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन आणि ऑप्शन डेल्टा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे युवकांच्या प्रशिक्षण केंद्राचे फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे आणि माजी निवृत्त पोलीस उप अधिक्षक अशोक चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते आज रविवारी (दि. ११) रोजी उद्घाटन झाले.
याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, माजी निवृत्त पोलीस उपअधिक्षक अशोक चव्हाण, माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे, पी के इंटरनेशनल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ काटे, उद्योजक संजयशेठ भिसे, आनंदा हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जैसवाल आदी उपस्थित होते.
माजी निवृत्त पोलीस उप अधिक्षक अशोक चव्हाण म्हणाले, उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे. राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते. त्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता आणि मोजमापाचे काही निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याची इत्थंभूत माहिती आणि तयारी प्रशिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे पोलीस आणि संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांनी प्रशिक्षण केंद्रामार्फत तयारी करून आपले इप्सित साध्य करावे.
कुंदाताई भिसे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी ध्यानी, मनी, पाषाणी फक्त एकच ध्येय समोर ठेवावे. मला माझ्या देशाचा विकास आणि त्याच्या संरक्षणासाठी सिद्ध व्हायचे आहे. मग ती सिद्धता पोलीस म्हणून असो की लष्करी किंवा डिजिटल माध्यमातील आव्हानांविषयी असोत, असा संकल्प मनाशी बाळगत त्यासाठी सिद्ध व्हावे. आम्ही परिसरात प्रशिक्षण केंद्राची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्या अंतर्गत लष्करी दलातील आग्निवीर आणि सशस्र दलासाठी भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण मार्गदर्शन, लेखी परीक्षा, मैदानी सराव आणि मुलाखतीची परिपूर्ण तयारी तसेच युपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा, स्टोक मार्केट प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंग, व्यवसायिक आणि प्रोजेक्ट व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करीत पिंपळे सौदागरमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. सहभागी युवकांना मैदानी प्रशिक्षण, लेखी तयारी, भरतीपूर्व परीक्षा चाचण्या, संपूर्ण नोट्स, अनुभवी शिक्षक, प्रशिक्षक या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. या माध्यमातून युवकांचे स्वप्न आणि देशाच्या परिपूर्णतेसाठी एक पाउल पुढे टाकले आहे, त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कुंदाताई यांनी केले आहे.
पीके इंटरनेशनल स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे म्हणाले, सर्वांगीण शिक्षण हा युवकांच्या जीवनाचा विकास आणि परिवर्तन याची गुरुकिल्ली आहे. २१ व्या शतकातील आव्हानांची पूर्तता करण्यासाठी भारतीय शिक्षण आणि संस्कृतीशी जोडलेली शिक्षण व्यवस्था आहे. परंतु, सध्या डिजिटल क्षेत्रातील कवाड युवकांना खुणावतात. आज भारतात इंटरनेट क्रांतीची सुरुवात झाली आहे. बहुतांश कंपन्या कंपन्या आपल्या मार्केटिंगच्या रणनिती इंटरनेटला ध्यानात ठेवून तयार करतात. त्यामुळे डिजिटल क्षेत्रातील तज्ज्ञांना चांगली मागणी असेल. आज या नोकरीसाठी कोणत्याही मर्यादा नाहीत. परंतु त्यासाठी शाश्रशुद्ध प्रशिक्षण देखील महत्वाचे आहे. तुम्ही टेकसॅव्ही असाल आणि टेक्नॉलॉजीत चांगलं भविष्य घडवू इच्छिता तर तुम्ही या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवा आणि भविष्याची वाटचाल सुकर करा.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसुंधरा गोडसे यानी केले.


















