- अर्ज सादर करण्याचा आज अखेरचा दिवस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- चारचाकी वाहनांसाठी नव्याने सुरू होणाऱ्या केएन या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. नियमानुसार योग्य शुल्क भरून १३ डिसेंबर रोजी अर्ज कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक शुल्क भरून हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी अडीच दरम्यान परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करायचे आहे.
एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी १४ डिसेंबर २०२२ रोजी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) १४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष डीवाय आरटीओ पिंपरी- चिंचवड या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा पुणे येथील असावा, अशी अट घालण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी साडे तीन वाजता लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केले जाणार आहेत.















