न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची होणारी धावपळ बंद होणार आहे. आपोआप कनेक्शन धारकाच्या नावात बदल होण्यासाठी महावितरणने नवीन व्यवस्था सुरु केली आहे.
एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली, की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे वीज कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत होते. नव्या व्यवस्थेमुळे हे हेलपाटे वाचणार आहेत.
नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम’ जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक ऑनलाइनही भरू शकतो. शुल्क भरले की वीज मीटर नावावर होतो आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने येते. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्स्फर करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते. वीज मीटर एकच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते.















