न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. यानंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप आज सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा आज सकाळपर्यंत सुरू होत्या. दुपारी ३ पर्यंत बंद पाळतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत. विरोधी पक्षांनी व्यापाऱ्यांच्या संघटनेला बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांच्या संघटनेने ‘बंद’च्या आवाहनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील दुकाने मंगळवारी बंद राहणार आहेत.
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून लाल महाल या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. डेक्कन जिमखाना, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग मार्गे लाल महाल येथे मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. खासदार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शहर आणि जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.















