न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेमार्फत शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस) उभारण्यात आले आहे. या कार्यालयाअंतर्गत शहर विकासाच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यासाठी प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या कंपनीमार्फत अग्निशमन व बचाव कार्यासाठी सल्लागार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार, या कंपनीला २७ लाख रूपये वाढीव देण्यात येणार आहेत.
महापालिका माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत जेएनएनयुआरएम, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना तसेच कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी सेल (सीएसआर) सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) अमृत योजना आदी विविध योजनांचे कामकाज करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने या कामकाजासाठी शहर परिवर्तन कार्यालय (सीटीओ) उभारण्यात आले आहे. या कार्यालयाच्या कामकाजासाठी प्रधान सल्लागार म्हणून पॅलॅडीयम कन्सल्टींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०२१ पासून एक वर्ष कालावधीसाठी दरमहा २४ लाख १६ हजार रूपये याप्रमाणे २ कोटी ८९ लाख ९९ हजार रूपये खर्च करण्यात आला आहे. महापलिकेच्या अग्निशमन व बचाव कार्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे.


















