न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्र. २४ मध्ये आवश्यक ठिकाणी नविन पाईपलाईन टाकणे, वॉल्व बसविणे तसेच इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. याकामी ६१ लाख रुपये खर्च होणार आहे. सन २०२२-२३ करीता एल्प्रो पाण्याच्या टाकीमार्फत होणा-या जलक्षेत्राच्या परिसरात पाणीपुरवठा विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी ४२ लाख रुपये खर्च होईल.
महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाच्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर लाईट हाऊस प्रकल्पाकरीता आवश्यक स्थापत्य विषयक कामे करणे तसेच अंतर्गत विद्युत विषयक कामे करण्यात येणार असून याकामी ४१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्र. १४ मधील आकुर्डी, दत्तवाडी व इतर परिसरातील महापालिकेच्या शाळा इमारतींची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी ४३ लाख रुपये खर्च होणार आहे. या विषयांसह तरतूद वर्गीकरणाच्या तसेच महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली.


















