न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- रेकी करून भरदिवसा बंद घरे फोडणाऱ्या सराईत महिलेला चिखली पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तिच्याकडून एक लाख १७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मीरा अशोक साठे (वय ३५, रा. चिंचवड ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. चिखली येथे ८ डिसेंबर रोजी भरदिवसा घर फोडल्याचा प्रकार घडला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना चिखलीचे वरिष्ठ निरीक्षक बाबर यांनी तपास पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार, तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक राकेश गुमाने यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्हीची पाहणी करीत आसपासच्या नागरिकांकडून माहिती घेतली. यामध्ये स्कार्फ बांधलेली एक महिला दुचाकीवरून संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्यानुसार, पोलिसांनी संशयित महिलेचा शोध सुरू केला.
दरम्यान, साने चौकात संशयितपणे फिरत असलेली महिला घरकुल परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घरकुल परिसरातून महिलेला ताब्यात घेतले. महिलेकडे चौकशी केली असता तिने साने चौकातील घरफोडी केल्याचे कबूल केले.
आरोपी महिला दुचाकीवरून फिरून बंद घरांची पाहणी करायची. त्यानंतर महिला असल्याने तिला घरात सहज प्रवेश मिळत होता. आरोपी महिला पोलिस रेकॉर्डवरील असून, तिच्यावर सन २००८ मध्ये पिंपरी आणि सन २०२२ मध्ये वाकड पोलिस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
















