- त्या ठेकेदाराला नोटीस; खुलासा करण्याची केली मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पाण्यासाठी धरणाजवळ जॅकेवल व पंपिंग स्टेशन उभारले जात आहे. त्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींसंदर्भात खुलासा करावा, अशी नोटीस पिंपरी-चिंचवड महापालिकेने संबंधित ठेकेदाराला दिली आहे. त्यासाठी ७२ तासांचा कालावधी देण्यात आला आहे.
या धरणातून १६७ एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. पाणी उपसा करण्याच्या वरील कामांची मूळ १०३ कोटींची निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने त्यातील अटी व शर्ती बदलून नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी १२१ कोटींचा खर्च ग्राह्य धरण्यात आला. त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या. निविदेस विलंब तसेच, साहित्यांच्या किमतीमध्ये दरवाढ झाल्याने तो खर्च १५१ कोटींपर्यंत पोहोचला आहे. या निविदेत गोंडवाना कन्स्ट्रक्शन कंपनी आणि टीअॅण्डटी कंपनी पात्र ठरली आहे.
गोंडवाना कंपनीवर राज्यात अनेक ठिकाणी कारवाई झाली आहे. ती बाब कंपनीने पालिकेपासून लपवून ठेवली. तसेच, पालिका अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून कामाचा खर्च ३० कोटींनी फुगविला आहे, अशा तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आप व विविध संघटनांनी केला आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार, पालिकेने संबंधित ठेकेदाराला गुरुवारी (दि. १५) सकाळी नोटीस बजावली आहे. नोटिसाबाबत खुलासा करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली आहे. ही नोटीस स्थापत्य विभागाचे देवान्ना गवार यांनी दिली आहे. तसेच, राज्य शासनाच्या पोर्टलवर या कामांसंदर्भातील साहित्यांचे दर तपासून घेतले आहेत. भाववाढ झाल्याने निविदेचा दर योग्य असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
भामा आसखेड धरणावरील जॅकवेल व पंपिंग स्टेशनच्या निविदेसंदर्भात विविध तक्रारी पालिकेस प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत सर्व बाजूने चौकशी केली जात आहे. संबंधित ठेकेदाराकडून तक्रारीच्या संदर्भात खुलासा मागविला आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
– प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त…
















