न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलिस सह आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.
भारतीय पोलिस सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात शनिवारी (दि. १७) मनोज लोहिया यांच्या नेमणुकीचे आदेश देण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस सह आयुक्त हे पद मंजूर नाही. मात्र, शासनाने या आदेशात पदनिर्मिती केली असून, मनोज लोहिया यांची नियुक्ती केली.
राज्यातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तत्पूर्वी पिंपरी- चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची मंगळवारी (दि. १३) बदली झाली. विनय कुमार चौबे यांनी नवीन पोलिस आयुक्त म्हणून बुधवारी (दि. १४) पदभार स्वीकारला.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पोलिस आयुक्त, अपर आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. तसेच आणखी एक अपर आयुक्त, तीन उपायुक्त आणि चार सहायक आयुक्त यांची पदे मंजूर करण्यात यावीत, असा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. प्रस्ताव सादर केलेल्या पदांबाबत कोणताही निर्णय अद्याप वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आलेला नाही. मात्र, नव्याने पोलिस सह आयुक्त’ हे पद निर्माण करण्यात आले आहे.
चिचवड येथील शाळेच्या इमारतीत पोलिस आयुक्तालयाचे कामकाज सुरू आहे. ही इमारत अपुरी आहे. येथे नव्याने दालन उभारणे शक्य नाही. त्यामुळे अपर आयुक्तांच्या दालनात सह आयुक्तांची व्यवस्था होऊ शकते. अपर आयुक्तांना मुख्यालय उपायुक्तांच्या दालनात, तर मुख्यालय उपायुक्त यांना प्रशासन सहायक आयुक्त यांच्या दालनात बसावे लागू शकते.















