- चिखली पोलिसांची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात व संपुर्ण शरीरावर पालघन आणि तलवारीसारख्या लोखंडी पट्टीने वार करून सुरज उर्फ सोन्या संदिप शिंदे (वय २२ वर्षे) याचा खुन केला होता. ही घटना (दि. २३) रोजी सायं. ६.४५ वा चे सुमारास बैलगाडा शर्यत घाट, महादेवाच्या मंदिराजवळ, जाधववाडी, चिखली येथे घडली होती. त्यानंतर मारेकरी पसार झाले होते.
फिर्यादी किशोर दत्तात्रय सोनवणे (वय १८ वर्ष, जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिली होती. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपींचा घरकुल, चिखलीगाव, जाधववाडी, इंदायणी नदी काठी, मोईगाव परीसरात शोध घेत होते. आरोपी हे निघोजे परिसरात लपलेले आहेत, परंतु निश्चित ठिकाण माहीत नसल्याने तपास पथकाने तात्काळ तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने निघोजे परिसरात तब्बल ३ तास शोध घेतला. दरम्यान आरोपी हे बैलगाडा घाट निघोजे येथे अंधाराचा फायदा घेवुन पळू लागले. तपास पथकातील अधिकारी व सर्व पोलिसांनी अंधारात पाठलाग करून आरोपी आदित्य पोटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, विधीसंघर्षित बालक (सर्व रा. चिखली) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
निर्घुण खून करून समाजात दहशत पसरवणाऱ्या फरार आरोपींना चिखली पोलिस तपास पथकाने तात्काळ अटक केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिखली पोलिसांचे कौतुक होत आहे. गुन्हयाचा पुढील तपास चिखली पोलीस करित आहेत.
















