- लोणावळा शहर पोलिसांकडून मार्गदर्शक प्रणाली जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांकडून मार्गदर्शक प्रणाली जाहीर करण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल, खाजगी बंगला आणि फार्म हाउस यांच्या मालकांना आणि प्रतिनिधीना पोलिसांनी सतर्क राहण्यास सांगत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने हॉटेल, खाजगी बंगला यांच्या प्रशासनाला कलम १४९ प्रमाणे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हॉटेल, खाजगी बंगल्यामधील स्टाफ व येणाऱ्या पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे. हॉटेल, बंगल्यामध्ये प्रवेश करताना पर्यटकांची तपासणी करण्यात यावी. त्या करीता प्रवेशव्दारावर खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला सुरक्षा रक्षकाची नेमणुक करावी. तसेच घातपात विरोधी तपासणी करण्यासाठी डी. एफ.एम.डी.ची व्यवस्था करून त्याव्दारे तपासणी करावी. येणा-या प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासूनच प्रवेश देण्यात यावा. तसेच ग्रुपने येणाऱ्या पर्यटकांची प्रत्येकांची तपासणी करुन त्यांच्या ओळखपत्राची एक छायांकीत प्रत घेण्यात यावी.
नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमाच्या ठिकाणी काही अप्रिय घटना घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी व परिसरात बेवारस वस्तु किंवा संशयीत इसम आढळुन आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ संर्पक साधवा. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दीमुळे चो-या, महिलांची छेड काढणे, चेंगराचेंगरी असे प्रकार टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच देखरेख ठेवावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी अति तत्काळ बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरुन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पर्यटकांना तत्काळ बाहेर पडता येईल किंवा बाहेर काढता येईल, अश्या व्यवस्थेबाबत पर्यटकांना अवगत करावे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईसाठी अधिकृत विज जोडणी घेवून एम.एस.ई.बी. कार्यालयाकडून विद्युत रोषणाईची तपासणी करुन घ्यावी. शॉर्ट सर्किटसारखे प्रकार घडणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करावी. वाहने हॉटेल समोर उभी राहुन त्यामुळे गर्दी होवुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच पार्किंग प्रवेशद्वाराजवळ पार्किंग केलेल्या वाहनाचे सर्व नंबर येतील अश्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसवावा. तसेच येणा-या वाहनाचे चालकांचे नाव, पत्ता व गाडीनंबर घेण्यासाठी एक रजिस्टर ठेवण्यात यावे. आजुबाजुच्या लोंकाना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी. स्टाफकडून घातपाती कृत्य टाळण्यासाठी हॉटेलची संपूर्ण तपासणी करुन घ्यावी. कोठेही संशयीत वस्तु आढळुन आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधवा. हॉटेलचा / खाजगी बंगल्याचा परिसर सी. सी.टि.व्ही कॅमेरा कक्षेत येईल अशी व्यवस्था करण्यात यावी.
कार्यक्रमात काही पर्यटक मद्य प्राशन करून हॉटेलमध्ये येणा-या स्त्रिया व मुलीची छेड काढल्याचे प्रकार होवून वाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ३१ डिसेंबर रोजी बारा वाजेपर्यंत स्पिकर लावण्याची परवनागी देण्यात आलेली असुन रात्री १२ नंतर स्पिकर लावल्यास मा. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास हॉटेल व बंगले प्रशासनाला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या मार्गदर्शक प्रणालींचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी केले आहे.















