- भूमिकेशी विसंगत व्यवहार कटाक्षाने टाळा, अन्यथा कारवाई; आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- महापालिका करसंकलन विभागाचा पत्रव्यवहार करताना विसंगत भूमिका घेणे, कार्यालयीन शिस्तीचा भंग करणे, कर्तव्यात कसूर आणि वरिष्ठांची दिशाभूल करत सामान्य प्रशासन विभागाचा वेळ, श्रम आणि उर्जा नाहक खर्ची घातल्याने करसंकलनचे विभाग प्रमुख निलेश देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली. तसेच भविष्यात अशी चूक केल्यास महापालिका नियमाधीन कारवाईचा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.
महापालिका करसंकलन विभाग हा स्थायी उत्पन्न मिळवून देणारा आहे. या विभागाशी नागरिकांचा थेट संबंध येतो. त्यामुळे विभागातील दोन लिपिकाच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी येवू लागल्याने महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. त्याबाबत दोन लिपिकांच्या बदल्या करण्याचा पत्रव्यवहार करसंकलन विभाग प्रमुख निलेश देशमुख यांनी आयुक्तांकडे केला. त्यानूसार सामान्य प्रशासन विभागाने त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्य विभागात करुन त्यांच्या जागी पर्यायी कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र, पर्यायी उपलब्ध केलेल्या कर्मचा-यांना करसंकलन कामाचा कोणताही अनुभव नाही. कामकाजात आणि वसुलीत व्यत्यय येत आहे. त्यामुळे बदली आदेश रद्द करण्यात यावा, अशी शिफारस देशमुख यांनी केली.
या कर्मचा-यांचे कामकाज, तक्रारीची शहानिशा न करताच बदलीची शिफारस केल्याने करसंकलन विभाग प्रमुख निलेश देशमुख यांची आयुक्त शेखर सिंह यांनी चांगलीच कानउघडणी केली. तसेच बदली केलेला आदेश पुन्हा पाच दिवसात लगेचच रद्द करा, अशी केलेली शिफारस पुर्णपणे विचार न करता केलेली आहे. केवळ आपल्या सोईनुसार आणि सामान्य प्रशासन विभागाचा वेळ, श्रम आणि उर्जा ही नाहक खर्ची करणारी आहे. विभाग प्रमुख म्हणून आपले हे कृत्य कार्यालयीन शिस्तीशी सुसंगत असून केवळ वेळेचा अपव्य करणारा आहे. यापुढे करसंकलनच्या कामकाजाबाबत संबंधित कोणताही पत्रव्यवहार करताना ठामपणे भूमिका स्पष्ट करावी, एकदा पत्रव्यवहार केल्यानंतर त्याच भूमिकेशी विसंगत व्यवहार कटाक्षाने टाळावा, भविष्यात अशा प्रकारची बाब निदर्शानास आल्यास कर्तव्यात कसूर आणि वरिष्ठाची दिशाभूल केल्याने आपणावर महापालिका नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद आयुक्त शेखर सिंह यांनी देशमुख यांना नोटीसीद्वारे दिली आहे.


















