न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाकडून सातही वॉर्डातील मिळकतीची त्रैवार्षिक करआकारणी पुनर्रचना करण्यात आली आहे. या कर आकारणीत सुमारे ३०० ते ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नियमबाह्य व अयोग्य पद्धतीने वाढ केल्याने वार्षिक करपात्र मूल्य वाढून अवास्तव करवाढ होणार आहे. त्यामुळे कमाईतून फक्त करच भरत राहायचा?,असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षांसाठी वार्षिक करआकारणी पुनर्रचना केली आहे. कॅन्टोनमेंटने कर आकारणीबाबत हरकती नोंदविण्यासाठी आवाहन केले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी ३०० ते ४०० टक्के वार्षिक करमूल्य वाढविण्यास विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कॅन्टोन्मेंट पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला होता. कॅन्टोन्मेंटने करवाढ रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.
दोन वर्षांत कोरोनामुळे झालेले नुकसान आदी कारणांमुळे नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच करण्यात आलेल्या या करवाढीमुळे अडचणीत भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी येत्या तीन वर्षांसाठी करवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. चिंचोली, शेलारवाडी ग्रामस्थांनी तीन वर्षात होणारी मिळकत कर व पाणी करातील वाढ रद्द करण्याची मागणी कॅन्टोन्मेंटचे सीईओ व सदस्य यांच्याकडे केली. त्यावेळी ६ जानेवारीपर्यंत लेखी हरकती दाखल कराव्यात. त्यानंतर विचार करण्यात येणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
वार्षिक करयोग्य मूल्यात ३०० ते ४०० टक्के वाढ करण्यात आली असून, ती अन्यायकारक आहे. रेडझोन असल्याने बोर्डाकडून कोणत्याही प्रकारची ठोस विकासकामे झालेली नाहीत. कोरोनामुळे रोजगार कमी झाले आहेत. उपजीविकेचे साधन नसल्याने करवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. – बाळासाहेब शेलार, अध्यक्ष, देहूरोड शहर भाजप…
कॅन्टोन्मेंट हदीतील नागरिकांनी वार्षिक करमूल्याबाबत लेखी हरकती विहित मुदतीत दाखल कराव्यात. सुनावणी घेण्यात येणार असून त्यात वार्षिक मूल्य निश्चितीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
– अमितकुमार माने, सीईओ, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड…


















