न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून एक-दोन नव्हे तर तब्बल ११ दस्तांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. कार्यालयाची कोणतीही तोडफोड न होता झालेल्या या चोरीमुळे संशय निर्माण होत आहे. १६ डिसेंबर २०२२ पूर्वी ही घटना घडली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रतन मोतीराम मराठे (वय ४९, रा. भुशी, लोणावळा) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी (दि. ४) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव मावळ दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. यापूर्वी जमिनीची बनावट खरेदी विक्री सारखे दस्त नोंदवून घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच यापूर्वी वेळोवेळी दुय्यम निबंधकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात दस्त चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी आपसांत संगनमत करून अभय रतीलाल जसानी यांची मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने मूळ दस्तांचा थांगपत्ता लागु नये यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथील १९८९ पासून ते १९९८ पर्यंतचे तब्बल ११ दस्त दुय्यम निबंधक कार्यालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अभिलेखातुन काढून घेऊन नष्ट केले आहेत. फिर्यादी रतन मराठे यांनी दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजीचा तक्रारी अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.
















