न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- अकरा वर्षांपूर्वी निगडीतील प्राधिकरण येथे घरात शिरून महिलेचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लक्ष्मण प्रभू वाघ (रा. गणेश तलाव, आकुर्डी, मूळ मु. पो. फुलारवाडी, ता. पाथरी, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. तर शीतल विनय ओहोळ (वय ३२, रा. सेक्टर क्रमांक २६, प्राधिकरण, निगडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
२६ ऑगस्ट २०११ ला आरोपीने घरात शिरून शीतल यांच्यावर कोयत्याने वार करीन त्यांचा खून केला. त्यानंतर सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख १४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून तो पसार झाला. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर वाघ याचे नाव समोर आले. त्याच्या मूळगावी सापळा रचून त्याला अटक केली.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश, वडगाव मावळ यांच्यासमोर झाली. त्यात वाघ याला खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन महिने साधा कारावास व जबरी चोरीच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे सक्षम कारावास व तीन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
















