न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- चिंचवडमध्ये पिंपरी-चिंचवड सिटी सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी दुबई येथील उंच व आकर्षक इमारतीची रचना पाहण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह रविवार (दि. १५) पासून शनिवार (दि. २१) पर्यंत दुबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या गैरहजेरीत आयुक्त पदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयुक्त सिंह यांच्या सोबत पालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी हे स्थापत्य विभागाचे अधिकारी आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड डी मार्टजवळील ३९.४६ चौरस मीटर इतकी जागा सिटी सेंटरसाठी आरक्षित आहे. पीपीपी तत्त्वावर सिटी सेंटर बांधण्याचे नियोजन आहे. सिटी सेंटरमध्ये कार्यालये, हॉटेल, करमणूक केंद्र, व्यापारी गाळे, बहुउद्देशीय हॉल, वाहनतळ आदी सुविधा असणार आहेत.नवी दिल्लीतील हेबिटाट सेंटर, मुंबईतील माइन्स स्पेस मालाड आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, हुस्टन सिटी अमेरिका, दुबई धर्तीवर हे सेंटर उभारण्यात येणार आहे. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी केपीएमजीला या सल्लागार एजन्सीची नियुक्ती केली आहे. या सल्लागार संस्थेला १२ महिन्यांसाठी २ कोटी ९ लाख रुपयांचे शुल्क दिले आहे.