न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र रेंजर्स या संस्थेचे गिर्यारोहक तानाजी केंकरे यांनी चढाईला अत्यंत कठीण श्रेणीमध्ये गणला जाणारा लिंगाणा हा सुळका अवघ्या ११ मिनिटे २२ सेकंदात चढाई करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
तीव्र उंची व खडकाळ निसरडी वाट असलेला लिंगाणा हा अतिशय दुर्गम असा ३१०० फूट उंचीचा सुळका असून तानाजी यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सह्याद्रीविषयी असलेले अतोनात प्रेम यांच्या जोरावर तो लिलया सर केला. सर्वसाधारण लिंगाणा सुळका चढाईसाठी गिर्यारोहकांना क्षमतेनुसार २ ते ३ तास एवढा कालावधी लागतो.
https://drive.google.com/drive/folders/1JrS7eF2HHVrC1OREkAdGkUm7lVHLJzLf
लिंगाणा किल्ला हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग असून महाडपासून सुमारे १६ किमी अंतरावर आहे. चढाईसाठी अरुंद वाटा अन विविध घाटांच्या दुर्गम भागातील लिंगाणा या सुळक्याच्या अवघड चढाईची आखणी महाराष्ट्र रेंजर्स या गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संस्थेने केली. तानाजी व टीमने ११ जानेवारी २०२३ रोजी लिंगाण्यालगत मोहरी या गावी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लिंगाण्याची वाट धरली. अरुंद अशी निसरडी बोराट्याची नाळ उतरुन टीम लिंगाणा सुळक्याच्या पायथाशी पोचली. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तानाजीने हा विश्वविक्रम रचला.
तानाजी यांनी गिर्यारोहण क्षेत्रातील बेसिक तसेच ऍडव्हान्स रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले असून ते सुवर्णपदक विजेते आहेत. ते एक अनुभवी ट्रेक गाईड म्हणूनदेखील कार्यरत आहेत. तानाजीने याआधी वजीर, वानरलिंगी, कळकराई, तैलबैला यासारख्या अत्यंत कठीण अशा सुळक्यांवर यशस्वीरीत्या चढाई केली आहे.
या मोहिमेत महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे प्रदीप गायकवाड, जयेश हरड, कुलदीप काळे, सुनील येवले, इशा फोटोग्राफीचे प्रमुख मिलन गायकवाड, सर्पमित्र साईदास कुसळ आणि निता गजरे इ. गिर्यारोहक सहभागी झाले होते. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र रेंजर्स संस्थेने तानाजीचे अभिनंदन केले तसेच सर्व क्षेत्रातून तानाजीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


















