- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; पराभवाचा वचपा काढण्याची हीच संधी..
- चिंचवड विधनासभेची पोटनिवडणूक लढविण्याचा ठराव एकमताने पारित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- निवडणूक आयोगाने दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेच्या रिक्त जागेवर पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. २०) रोजी शहर राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात निवडणूक लढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बैठकीत निवडणूक लढविण्यबाबत कार्यकर्ते आक्रमक भमिका मांडताना दिसले.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार हवा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पक्षचिन्ह घड्याळावरच चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक लढावावी. निवडणूक झाल्यास कुठल्याही इतर पक्षांना ही जागा सोडू नये. गेल्या अनेक वर्षांपासून चिंचवड मतदारसंघ दहशतीच्या वातावरणाखाली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणुक लढवून आपण जिंकू, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
” ना भीती ना सहानुभूती ” असा निर्धार करून चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणुक लढविण्याचा ठराव आज शुक्रवारी शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी एकमताने पारित केला.
भाजपचे आक्रमक राजकारण पाहता आपण आपला हक्काचा मतदारसंघ कुठल्याही भावनिक कारणामुळे किंवा राजकीय अपरिहार्यतेसाठी इतर पक्षांसाठी सोडू नये. पंढरपूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची ही संधी आहे. तसेच कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि पक्षवाढीच्या दृष्टीने ही जागा राष्ट्रवादीने लढवायला हवी, असे मत कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडले.
या बैठकीस राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, जेष्ठ नगरसवेक भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक मयुर कलाटे, राजेंद्र जगताप, अरूण बोऱ्हाडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, नारायण बहिरवडे, विविध सेलचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते भाऊसाहेब भोईर, मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आपले मनोगतं व्यक्त केले.