न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. सोमवार-मंगळवारी मुंबईत बसून महाविकास आघाडी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.
दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांची आज भेट घेणार आहे. त्यांनी माझ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत.
तसंच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसणे गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे, असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी, असं अजित पवार म्हणाले.