- स्थानिक नेतृत्वाकडून निवडणूक लढविण्याचा संकल्प..
- राष्ट्रवादीपुढे पेच; महाविकास आघाडीशिवाय निवडणुकीला जाणार सामोरे?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यास आग्रही असून तशी तयारी राष्ट्रवादीने केली आहे. अंतिम निर्णय शरद पवार हे घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे. आता या पोटनिवडणूकीत काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी देखील उडी घेतली असून ते निवडणुकीची तयारी करत आहेत.
भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भाजपाकडून जगताप यांच्या पत्नी आश्विनि जगताप किंवा बंधू, शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस देखील उतरणार आहे. काँग्रेसची शनिवारी बैठक पार पडली. यात चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठराव झाला आहे. निवडणूक लढवण्यास कार्यकर्ते आग्रही आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्यास आम्ही त्यांचे काम करू. पक्षाने ऐकला चलो चा नारा दिल्यास आमची ऐकला चालण्याची तयारी आहे, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांनी व्यक्त केली आहे. उद्या याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्याशी चर्चा करणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले आहे.
याच जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असून तसा ठराव पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांच्या उपस्थितीत संमत करण्यात आला, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी दिली आहे. या बैठकीस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख, उपशहर प्रमुख, विधानसभा प्रमुख, महिला पदाधिकारी उपस्थित होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सहा नगरसेवक आहेत. चिंचवड विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिल्यास त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत सर्वांनी व्यक्त केला आहे. शिवसैनिकांची ही मागणी आपण संपर्क नेते आणि ज्येष्ठ नेत्यांपुढे मांडू असेही ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले आहे.