- कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तारांबळ; शिक्षकांकडून पदरमोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रमात एक हजार विद्यार्थी सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमासाठी हजर होते. त्यांना नाष्टा मिळणार असे सांगितले गेले होते. मात्र, नियोजनाअभावी जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रमाचा फज्जा उडाला. या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता होणार असल्याचे आयोजकांनी सागितले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक सकाळी ९ च्या आधीच हजर होते. मात्र, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रेक्षकच हजर नसल्याने शेवटी अधिका-यांनी शिक्षकांना बोलावून आणून हॉलमध्ये बसविले. शेवटी दुपारी साडे बारा वाजता उपक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला लवकर आलेल्या मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यांची गैरसोय झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कार्यक्रमासाठी ९८ लाख रुपये खर्च केला आहे. खासगी संस्थेच्या सहकार्याने उपक्रम होत आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी जल्लोष शिक्षणाचा २०२३ हा उपक्रम सुरू आहे. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे विद्यार्थी शिक्षकां अधिकाऱ्यांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागले.
या उपक्रमात महापालिका शाळांसह शहरातील खासगी शाळांचाही सहभाग घेण्यात आला होता. परंतु, याकडे खासगी शाळांनी पाठ फिरवली होती. खासगी शाळांनी ना विद्यार्थी पाठवले ना सहभाग नोंदवला. प्रकल्प सादरीकरणासाठी एकूण ८७ प्रकल्पधारकांनी नोंद केली होती. त्यापैकी ६६ विद्यार्थी प्रकल्पांसह हजर होते. मागील आठवड्यातच शहरात विज्ञान प्रकल्प स्पर्धा झाल्या होत्या. त्यात ३०७ शाळांनी सहभाग नोंदवला होता.
या उपक्रमांत सहभागी विद्यार्थ्यांना नाष्टा व जेवण मिळणार असल्याचे सांगितले होते. सकाळी नऊ वाजता विद्यार्थी आले होते. मात्र, विद्यार्थ्यांना नाष्टा व जेवण न मिळाल्याने काहींनी स्वतः चा डब्बा खाल्ला तसेच काही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वडापाव आणून खाऊ घातला.
दोन दिवसांत दहा हजार विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या बैठका घेऊन त्यांना पूर्ण कल्पना दिली होती.
– संदीप खोत, उपायुक्त, महापालिका…