- पंप चालकांकडून आजपासून बेमुदत बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२३) :- गुजरातमधील टोरेंट गॅस या सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने शासनाने मंजूर केलेले कमिशन देण्यास टाळाटाळ केली. त्याच्या विरोधात पुण्यातील ग्रामीण भागातील ४२ सीएनजी पंप चालकांनी शुक्रवारपासून (दि. २७) हे पंप बेमुदत बंद ठेवले आहेत. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केंद्र शासनाने सीएनजी वितरकांसाठी वाढीव सेवामूल्य (कमिशन) जाहीर केले आहे. पुणे शहराला सीएनजी पुरवठा करणार्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने वाढीव सेवामूल्य विक्रेत्यांना दिले. मात्र, ग्रामीण भागात पुरवठा करणार्या टॉरेंट कंपनी व्यवस्थापन ते देण्यास टाळाटाळ करत आहे. याबाबत यापूर्वीही विक्रेत्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विक्रेते आणि कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली होती. त्यात कंपनीच्यावतीने सेवामूल्य देण्यासाठी वेळ मागून घेतला होता. पुन्हा दुसर्यांदा वेळ वाढून देण्यात आली. मात्र, सेवामूल्य दिले जात नाही, कधीपर्यंत देणार हे सांगितले जात नाही, त्यामुळे विक्रेत्यांनी संपाची हाक दिली आहे, असे पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सांगितले.
सन २०२१ मध्ये सीएनजी डीलर्सना फेअर ट्रेड मार्जिन (कमिशन) जारी करण्यात आले. मात्र, पुणे ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणार्या टोरेंट गॅस कंपनीला अनेकवेळा विनंती करूनही त्यांनी कमिशन दिले नाही. पुणे जिल्ह्यातील सीएनजी वितरकांचे आजपर्यंत जवळपास आठ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कमिशन देऊ नये, यासंबंधी केंद्र शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत, असे असताना टाळाटाळ केली जात आहे, असेही रुपारेल यांनी सांगितले.
पुणे शहरातील सर्व सीएनजी पेट्रोल पंप खुले आहेत. टोरेंट गॅसचा पुरवठा होणारी पुणे शहराबाहेरील सीएनजी स्थानके बंद आहेत. एमएनजीएलची पुणे शहरातील स्थानके नियमितपणे खुली आहेत, अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला यांनी दिली.