- चिंचवड विधानसभेसाठी भाजपकडून माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२३) :- चिंचवड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीसाठी अद्याप कुठल्याच पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी, भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार? याचा तिढा सुटल्यात जमा आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या नावावर पक्षाकडून जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळतेय.
सुरुवातीपासूनच उमेदवारीसाठी शंकर जगताप यांच पारडं जड मानलं जात होतं. विरोधकांकडून त्यांच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण केला जात होता. मात्र, भाऊंचा राजकीय वारसा चालविण्यासाठी शंकर जगताप हेच प्रमुख दावेदार असल्याची मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली. लक्ष्मणभाऊ आजारी पडल्यानंतर चिंचवडची धुरा शंकर जगताप यांनी स्वतःच्या खांदयावर घेतली. मतदार संघातील अभ्यास आणि कार्यकर्त्यांमधील आदरयुक्त दबदबा पाहून पक्षश्रेष्ठीना त्यांच्या कामाची दखल घ्यावी लागली. पक्षाने चिंचवड विधानसभेच्या निवडणूक प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली.
एकीकडे बंधूंचे आजारपण आणि दुसरीकडे मतदार संघातील विकासकांची धुरा शंकर जगताप यांनी लीलया पेलली. लक्ष्मणभाऊंच्या अजेंड्यावरील विकासकामांना प्राथमिकता देत त्यांनी अधिकाऱ्यांकडे निवेदनं आणि पत्रांच्या माध्यमातून कामे मार्गी लावली. लक्ष्मणभाऊंच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेतील कामांचा आढावा घेत त्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांपर्यंत शंकर जगताप यांचे काम पोहोचले. भाऊंनंतर कामाला न्याय देणारा माणूस अशी ओळख शंकर जगताप यांनी नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना उद्या मंगळवारी (दि. ३१) रोजी लागू होणार आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून पक्षानेदेखील लक्ष्मणभाऊंचा राजकीय वारसा चालविण्यासाठी शंकर जगताप हेच प्रमुख दावेदार असल्याचे खाजगीत मान्य केले असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे त्यांची चिंचवड विधानसभेची उमेदवारी फिक्स झाल्याची माहिती मिळतेय.