- पालिकेच्या रुग्णालयांचा कारभार अजूनही जुन्याच बुरसटलेल्या चालीरीतीने सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असतानाच महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार मात्र संथगतीनेच सुरु आहे. संगणकाच्या जमान्यात पालिकेची रुग्णालये जुन्याच पद्धतीने कारभार हाकताना दिसतायेत. पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात याचा प्रत्यय रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रोजच येतोय.
विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी दररोज रुग्ण नातेवाईकांबरोबर रुग्णालयात येतात. त्यांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी केसपेपरची गरज भासते. त्यासाठी रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना रांगेत थांबावे लागते. गोरगरिबांना खासगी रुग्णालयातील उपचाराचे दर खिशाला परवडत नसल्यामुळे पर्यायी पालिकेचा दवाखाना जवळ करावा लागतो. मात्र, रुग्णालयात पाय ठेवताच भल्या मोठ्या रांगेने त्यांचे स्वागत होते. केसपेपर काढण्यासाठी वेगळी रंग, पैसे भरण्यासाठी वेगळी रंग, डॉक्टरांकडे वेगळीच रंग अनं औषधांसाठी देखील रांग. या रांगेचा रुग्णांबरोबरच नातेवाईकांना देखील मनस्ताप सहन करावा लागतो.
संगणकाच्या जमान्यात बाहेरील देशांची रुग्णालये हायटेक होताना दिसत असताना, दुसरीकडे एकेकाळची आशिया खंडातील प्रगत पिंपरी चिंचवड महापालिका अजूनही जुन्या बुरसटलेल्या चालीरीती सोडायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांना ‘ इलाज नको पण रांग आवर ‘ असे म्हणण्याची वेळ आली आहे.