न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रविवार (दि १०) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेचा शुभारंभ महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैदयकीय संचालक डॉ .पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी महापौर राहुल जाधव यांचे शुभहस्ते महापालिकेच्या चिखलीतील म्हेत्रेवस्ती दवाखाना येथे केला आहे. यावेळी स्थानिक नगरसेविका योगीता नागरगोजे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, राज्य लसीकरण अधिकारी दिलीप पाटील, प्रांतपाल रो. एस. के. जैन, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, रोटरी क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
मनपा परिसरात ८७६ लसीकरण केंद्रामार्फत ८ प्रभारी वैदयकीय अधिकारी, रुग्णालय व ५३ वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २६१० लसीकरण कर्मचारी नेमून लसीकरण करण्यात आले. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष व स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिग कॉलेजचे विदयार्थी, एमपीडब्ल्यू, एएनएम, आशा स्वयंसेविका, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाड़ी मदतनीस व इतर विविध स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण ८७६ लसीकरण केंद्रामार्फत लसीकरण करण्यात आले. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा ८७६ ठिकाणी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ३१ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ६७ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली होती.
मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेटंग इ. माध्यमाद्वारे करण्यात आला. मोहिमेसाठी ५३ वैदयकीय अधिकारी, २० पर्यवेक्षक व २६१० लसीकरण कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिम यशस्वी करण्यात नगरसेवक, सर्व रोटरी क्लब अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. वीणादेवी गंभीर (तालेरा रुजणालय), डॉ. शैलजा भावसार (यमुनानगर रुग्णालय), डॉ. श्रीकांत शिंदे (भोसरी रुग्णालय), डॉ. मनोज देशमुख (वैद्य. अधिक्षक, वायसीएम रुग्णालय), डॉ. प्रकाश ताडे (प्रभारी वैदयकीय अधिकारी-सांगवी रुग्णालय), डॉ. संगीता तिरुमणी (जिजामाता रुग्णालय) , डॉ. सुनिता साळवे ( आकुर्डी रुग्णालय), डॉ. सुनिता इंजिनियर (थेरगांव रुग्णालय) व त्यांचे सर्व सहकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, डॉ. डी. वाय. पाटील नर्सिग महाविद्यालय, सिंबायोसिस, आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी, बालवाडी शिक्षिका, बचतगट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनिस यासर्वांचे सहकार्य लाभले.
महपालिका कार्यक्षेत्रात (दि. ११) पासून ५ वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण झाले आहे. याची खात्री करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणासाठी वापरण्यात येणारी लस जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणीत केलेली आहे. तसेच लसीकरण करणारे कर्मचारी प्रशिक्षीत आहेत. आपल्या घरातील व परिसरातील ज्या बालकांना (दि. १०) रोजीपासून पल्स पोलिओ लसीकरण झाले नसेल, त्यांनी घरी येणाऱ्या कर्मचा-यांकडून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.












