- औद्योगिक परिसरात महिलांसाठी साधी प्रसाधनगृहाची देखील सोय नाही, भोर यांची शोकांतिका
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च) :- जागतिक महिला दिनानिमित्त फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपर चिंचवड शहर विकास आघाडीच्या वतीने शुक्रवार (दि. ८) रोजी चिंचवडमधील ऑटो क्लस्टर सभागृहात महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास तीनशे ते चारशे महिलांनी उपस्थिती दर्शविली.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. ”उत्कृष्ट आई” हा पुरस्कार सिंधुताई सोपानराव भोर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या मुलींना देण्यात आला. सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील समूहांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी काही महिलांना पैठणी देण्यात आली. यावेळी फोरमचे अध्यक्ष अभय सोपानराव भोर, चित्रपट अभिनेते विनायक भावे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई आढळराव पाटील, कॅप्टन तनुजा काबरे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, वर्षा भोसले, सुनीता कौल, बीव्हीजी ग्रुपचे दत्ता गायकवाड, फोरमचे उपाध्यक्ष कार्तिक गोवर्धन, फोरमचे संघटक सुनील घोडेकर, पिंपरी-चिंचवड विकास आघाडीचे संघटक दादासाहेब कांबळे, चेतन साबळे, श्रीकृष्ण नरहरी, उद्योजिका व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर महिलांना उद्देशून प्रास्ताविक करताना म्हणाले की, ”महिलांनी अनेक छोटे-छोटे गट तयार केलेले होते. परंतु, या गटाला व्यासपीठ आम्ही निर्माण करून दिले आहे. आमच्या संघटनेने महिलांसाठी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला व तो तडीसही नेला. आज या व्यासपीठावर आम्ही तयार केलेल्या अनेक संस्थांचे उद्योजक प्रतिनिधी उपस्थित आहेत. अनेक महिला उद्योजकांना स्वतःचे उद्योग समूह सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. लवकरच महिलांसाठी क्लस्टर योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. परंतु, या औद्योगिक परिसरात महिलांसाठी साधी प्रसाधनगृहाची देखील सोय नाही”, अशी कैफ़ियतही भोर यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडली.

महिलांना मार्गदर्शन करताना कल्पनाताई आढळराव पाटील म्हणाल्या की, एमआयडीसी परिसरात लवकरच खासदार निधीतून महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय करण्यात येईल. तसेच महिलांना कुठल्या प्रकारची मदत अथवा शासकीय कर्ज घेण्यासाठी सर्वप्रकारे मदत केली जाईल. याप्रसंगी फोरमच्या महिला उद्योजिका वंदना जावरे, चंद्रकांत पवार व गीता महेंद्दृ यांनी स्वतःचा उद्योग-व्यवसाय कशाप्रकारे सुरू केला याविषयी मनोगत व्यक्त केले.
मेजर तनुजा काबरे यांनी महिलांनी सक्षम व्हावे व स्व-संरक्षणासाठी सामर्थ्यवान होणे गरजेचे आहे. तसेच त्या ‘फौजी की पाठशाला’ या नावाची संस्था चालवितात. त्या ठिकाणी महिलांना योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाते याबद्दल मार्गदर्शन केले.
अभिनेते विनायक भावे यांनी महिलांनी चित्रपटसृष्टी व नाट्य क्षेत्रात पुढे यावे. त्यांना सर्वोपरी मदत केली जाईल. तसेच महिलांचाही आपल्या जोडीदारावर पूर्ण विश्वास हवा. सर्वांनी महिलांचा आदर करावा आणि विश्वासाने रहावे, असे सांगितले.
पंतप्रधान योजनेच्या संचालिका वर्षा भोसले यांनी महिलांना मुद्रा लोन योजना व महिलांसाठीच्या अनेक योजना सांगितल्या व सर्वपरीने मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
बीव्हीजी ग्रुपचे गायकवाड यांनी महिलांना आरोग्य विषयक मोफत योजना सांगितल्या. तसेच लॅक्मे अकॅडमीच्या संचालिका सुमिता कौल यांनी महिलांना अकॅडमीतर्फे काही प्रशिक्षण व योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे निवेदन सह्याद्री वाहिनीच्या मृण्मयी यांनी, तर दुर्गा भोर यांनी आभार व्यक्त केले.















