- अवघ्या २२ दिवसांतच काळवंडले ‘ कृत्रिम फुफ्फुस ‘…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- पिंपरी चौकात शहरातील प्रदूषणाची गुणवत्ता तपासण्यासाठी पांढरे शुभ्र कृत्रिम फुफ्फुस ६ जानेवारीला लावण्यात आले होते. हे कृत्रिम फुफ्फुस अवघ्या २२ दिवसांतच काळवंडले आहेत. त्यामुळे या परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याचे दिसून येत आहे.
शहर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाबाबत सामान्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी. यासाठी परिसर संस्था आणि महापालिकेच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर चौकात कृत्रिम फुफ्फुसे बसविण्यात आली आहेत. अशाच प्रकारची कृत्रिम फुफ्फुसांचे डिजिटल फलक गेल्यावर्षी पुण्यातील संभाजी उद्यानात उभारण्यात आली होती. ती फुफ्फुस देखील अवघ्या महिनाभरात काळी पडली होती तर दिल्लीत नोव्हेंबर २०१८ मध्ये तयार केलेली कृत्रिम फुफ्फुसे अवघ्या सहा दिवसांत काळी झाली होती.
पिंपरी चौकात बसविण्यात आलेल्या कृत्रिम फुफ्फुसांच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा रंग काळा व्हायला सुरूवात झाली होती. सातच दिवसांत हा रंग करडा झाला. शनिवारी (दि. २८) या फुफ्फुसांचा रंग पूर्णतः काळा झाल्याचे दिसून आले. परिसर संस्थेच्या वतीने ६ जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ या एक महिन्याच्या कालावधीत हवेच्या दर्जाची तपासणी करण्यात येत आहे. या बिलबोर्डनुसार परिसरातील नागरिक दिवसांतून जवळपास १७ तास प्रदूषित हवेत श्वास घेतात. या भागातल्या हवेत सकाळी ६ ते ८ या वेळात पर्टिक्युलर मॅटर पोल्युटंट म्हणजेच पीएम २.५ हा घटक सर्वाधित असतो. या महिन्यांत सरासरी प्रत्येक दिवशी ८० ते १६० पर्यंत हवेची गुणवत्ता ढासळली होती.
माय राईट टू क्लिन एअर असे शीर्षक देऊन ही कृत्रिम फुफ्फुसे पिंपरीतील आंबेडकर चौकात उभारण्यात आली आहेत. महापालिका आणि परिसर संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमात हवेचे अत्युच्च प्रदुषणामुळे घातक घटक आपल्या फुफ्फुसात जात असल्याचे दिसून येत आहे. कृत्रिम फुफ्फुसाचे बदलेले रंग हे याचे ‘इंडिकेटर’ आहेत.
श्वेता वर्णेकर, परिसर संस्था…