- आकृतीबंधाला प्रशासकीय मान्यता; ४०७ पदांची होणार भरती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने सोमवारी (दि ३०) मान्यता दिली. या आकृतीबंधानुसार ४०७ पदे भरली जाणार आहेत. त्यातील १५७ पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत. तर, उर्वरित २५० पदे प्रतिनियुक्तीने भरली जाणार आहेत.
अपर मुख्य सचिव वित्त तथा कार्यकारी समितीचे अध्यक्ष मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली. बैठकीला नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला, सह आयुक्त बन्सी गवळी व स्नेहल बर्गे, मुख्य अभियंता अशोक भालकर व विवेक खरवडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारा सविता नलावडे तसेच दोन्ही पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
मार्च महिन्यात होणाऱ्या प्राधिकरण सभेत आकृतीबंधाला मान्यता मिळाल्यानंतर व सेवा प्रवेश नियमावलीला शासन मान्यता मिळाल्यानंतर कर्मचारी व अधिकारी भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आकृतीबंध व सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे काम यशदाचे उपमहासंचालक प्रताप जाधव यांचे अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने केले आहे. या समितीमध्ये सेवानिवृत्त वरिष्ठ लेखा अधिकारी प्रमोद रेंगे व सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी मुकेश काकडे यांनी सदस्य म्हणून व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख यांनी सचिव म्हणून काम पाहिले. त्यांना सह आयुक्त बंसी गवळी व महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी मार्गदर्शन केले.
तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कर्मचान्यांच्या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अनुकंपा प्रतीक्षा यादीतील वारसाना विहित पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत नवनगर विकास प्राधिकरणाचे ४० कर्मचारी कार्यरत असून ५० अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.












