- मार्च अखेरीपर्यंत जप्ती अधिपत्रांची कडक अंमलबजावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- महापालिकेच्या कर संकलन विभागाने सहाशे कोटींची वसुली केली आहे. थकबाकीदार सदनिका, व्यावसायिक गाळे जप्तीची मोहीम सुरू आहे. मालमत्ता कर थकबाकी न भरल्यामुळे ५२६ मालमत्ता सील केल्या आहेत. आतापर्यंत ८ हजार ८३६ जप्तीची पत्रे तयार केली आहेत. पिंपरी- चिंचवडमधील महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने जानेवारी महिन्यातच विक्रमी कर वसूल केला आहे. १ लाख ६० हजार निवासी मालमत्ताधारकांकडे ४५० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. शहरात ५ लाख ९१ हजार मिळकतींची नोंद आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मोहिमेत मोठ्या प्रमाणात सदनिका, व्यावसायिक गाळे जप्त केले जात आहेत. थकबाकी न भरल्यामुळे ५२६ मालमत्ता सील केल्या आहेत. आतापर्यंत ८ हजार ८३६ जप्ती अधिपत्र तयार केली आहेत. तसेच ३ हजार २२५ मालमत्तांवर जप्ती कारवाई केली आहे. जप्तीनंतर २ हजार ८१२ मालमत्तांचा कर वसूल झाला आहे. वसूल झालेली कराची रक्कम ४३ कोटी ६८ लाख २१ हजार २३२ एवढी आहे. १० हजार, २५ हजार, ५० हजारापुढे मुळकर व थकबाकी असलेल्या मालमत्तांना जप्ती पूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.
दहा महिन्यांत ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर वसूल झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ संपण्यासाठी आता फेब्रुवारी व मार्च असे दोन महिने शिल्लक आहेत. या दोन महिन्यात उर्वरित मालमत्ता करधारकांकडून कर वसुलीचे नियोजन महापालिकेने केले आहे.
– मा. शेखर सिंह, आयुक्त..
१० हजार रुपये आणि २५ हजार रुपयांच्या पुढील मालमत्ता जप्ती पूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. सर्व जप्ती अधिपत्रांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या निवासी मालमत्तांकडे एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे, त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात येत आहे.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त..












