- महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- राष्ट्रवादीकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे चिंचवड विधानसभेचे उमेदवार म्हणून नाव अंतिम होताच कुठलाही विलंब न करता त्यांनी तडक आपला उमेदवारी अर्ज भरणा करण्यासाठी थेरगाव निवडणूक कार्यालयाकडे कूच केल्याची माहिती मिळतेय.
पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, शाम जगताप, माजी नगरसेविका शीतल काटे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी मार्गे ग प्रभाग येथील निवडणूक कार्यालयात पोहचणार आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच आज मंगळवारी अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी ट्विट करीत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. मविआचा अधिकृत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करताना शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये सोमवारी रात्री राष्ट्रवादीतील इतर इच्छुकांची मनधरणीची कसरत राष्ट्रवादीचे नेते दस्तुरखुद्द अजित पवार यांना करावी लागली असेल यात शंका नाही.


















