उच्चशिक्षित तरुणाचे अघोरी कृत्य; घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- दिल्लीवरून विमानाने आलेल्या इसमाने दाम्पत्याला टिकावाने मारहाण करून त्यांचा निर्घृण खून केला. यानंतर जगदंब जगदंब म्हणत तो परिसरात फिरत होता. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री दापोडी येथे घडली.
शंकर नारायण काटे (वय ६०), संगीता शंकर काटे (वय ५५) अशी खून झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी प्रमोद त्र्यंबक मंगरुळकर (वय ३२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगरुळकर हा काटे दाम्पत्याच्या खोलीमध्ये २०१९ पर्यंत भाड्याने राहत होता. दरम्यान, शनिवारी रात्री काटे
पती-पत्नी घरात असताना आरोपी घुसला. त्याने दाम्पत्याला मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने काटे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह गुन्हे शाखेचे युनिट घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीने पोलिसांना आपण दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करीत असल्याचे सांगितले. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
















