- चिंचवड मतदार संघातील सर्व बँकांना निवडणूक विभागाचे पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :-चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड जमा करणे किंवा काढण्याच्या व्यवहारांची तसेच संशयास्पद वाटणाऱ्या १ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या व्यवहारांची माहिती चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे दररोज पाठविण्याबाबत आज चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व बँकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक सुरु असून दि. २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता सुरु आहे. या आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीसंबंधी कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारांची बाब निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सर्व पथक प्रमुखांना दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची माहिती चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व बँकांना पाठविण्यात आली आहे.
संशयास्पद वाटणाऱ्या व्यवहारांची माहिती विहित नमुन्यात निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे. त्यामुळे सर्व बँकांकडून अशा व्यवहारांची दैनंदिन माहिती mcc205chinchwad@gmail.com या इमेल आयडीवर पाठविण्याबाबतचे लेखी पत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी सर्व बँकांना पाठविले आहे.
















