न्यूज पीसीएमसी नेटवर्क ‘
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- महाराष्ट्र राज्यातील २८ महानगरपालिका व ३६९ नगरपालिका व नगरपरिषदा मधील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन बुधवारी (दि. १५) रोजी पिंपरी चिंचवडमध्ये होत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन उर्फ शशिकांत झिंजुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील महानगरपालिका नगरपालिका व नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामगार प्रतिनिधी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड मध्ये अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत. यावेळी प्रामुख्याने मुंबईतील कामगार नेते अशोक जाधव, औरंगाबाद येथील कामगार नेते गौतम खरात, नागपूरचे कामगार नेते शब्बीर विद्रोही, ठाण्याचे कामगार नेते रवी राव, नाशिकचे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड, पुण्यातील कामगार नेत्या मुक्ता मनोहर आदिमसह राज्यभरातील साठहून अधिक कामगार नेते प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकेतील कायमस्वरुपी काम असणा-या सफाई सेवेतील व इतर सेवेतील ठेकेदारी पद्धत तातडीने बंद करुन आकृतीबंधामध्ये कायम कामगारांची पदे निर्माण करणे व ठेकेदारी बंद करणे. राज्यातील बालवाडी सेविका व अंगणवाडी सेविकांना मनपा सेवेत कायम करणे, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांमधील ठेकेदारांवरील कामगारांना समान काम, समान वेतन या न्यायतत्वाप्रमाणे कायम कामगारांनुसार वेतन देण्यात यावे. राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील सफाई सेवेतील स्वच्छतेचे काम करणा-या व रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचे काम करणा-या सर्व जाती संवर्गातील कर्मचा-यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागु करुन त्यांच्या वारसांना नोकरीमध्ये समाविष्ट करणे. राज्यातील अनेक महानगरपालिका कर्मचा-यांना सहावा वेतन आयोग व सातवा वेतन आयोग लागु केला असुन महानागरपालिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे सहावा व सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम अदा केलेल्या नाहीत. अशा महानगरपालिकांना राज्य शासनाने आर्थिक मदत करुन कर्मा-यांना सातवा वेतन आयोगाचा फरक अदा करणेत यावा, अशा विविध विषयांवर अधिवेशनादरम्यान चर्चा होणार आहे, असे बबन झिंजूर्डे यांनी सांगितले.


















