- महापालिका आस्थापनेवरील बदलीयोग्य कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ ते ‘ड’ मधील एप्रिल महिन्यात बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी पाठवावी. तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असेल, असे अर्ज विभागप्रमुखांनी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रशासन विभागाकडे पाठवावेत. याबाबतचे पत्रक सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी विभागप्रमुखांना सोमवार (दि. १३) रोजी पाठविले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी- चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण २०११ साली तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्तिक व वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्यात यावी. २८ कागदपत्रांसह प्रशासनाकडे यादी पाठवावी. मुदतीनंतर आलेले अर्ज प्रशासन विभागामध्ये स्वीकारले जाणार नाहीत. त्याचबरोबर ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बदली मिळण्याबाबतचा अर्ज संबंधित विभागाने प्रशासनास पाठविला नाही. त्याबाबत तक्रारी दाखल झाल्यास विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.
एकाच विभागात अनेक वर्ष काम केल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची मक्तेदारी होते. त्यामुळे एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, करोनामुळे गेली दोन वर्ष कोणत्याच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे बदलीसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या असण्याची शक्यता आहे.
गट ‘अ’, ‘ब’ मधील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता एकाच विभागात काम करावयाचा कालावधी तीन वर्ष राहील. त्यानंतर त्यांची बदली केली जाते. गट ‘क’ मधील कर्मचान्यांकरिता एकाच विभागात काम करण्याचा कालावधी सर्वसाधारणपणे सहा वर्ष राहील. तथापि, तीन वर्षानंतर कर्मचाऱ्यांकडील कामकाज विषय विभागातंर्गत बदलण्यात यावे. गट ‘अ’ ते गट ‘क’ मधील बदलीस पात्र अधिकारी, कर्मचान्यांच्या बदल्या दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात केल्या जातात.


















