- संस्थाचालकांच्या त्या सवलतीमुळे दरवर्षी घटतेय शहरातील शाळांची संख्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठीचे २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या वर्षी १७२ शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत.
आरटीई प्रवेशासाठी मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील १७० शाळांची नोंदणी करण्यात आली होती. तर, २०२१ मध्ये १७६ शाळांनी नोंदणी केली होती. यंदा ३ शाळांनी अल्पसंख्यांक दर्जाचे प्रमाणपत्र मिळविले असल्याने दरवर्षी शाळा नोंदणीचा आकडा कमी होत आहे.अल्संख्याक शाळांना आरटीईनुसार २५ टक्के आरक्षण देणेही बंधनकारक नाही. त्यामुळे शहरामध्ये अल्पसंख्यांक शाळांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन शासनाने अल्संख्यांक शाळांनाही ऑनलाईन भरती प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
तसेच, यावर्षी शहरातील तीन शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे शाळांची दरवर्षी नोंदणी कमी होताना दिसत आहेत. शहरात देखील अनेक शाळा केवळ भाषिक अल्पसंख्याकाचा दर्जा मिळवत अल्पसंख्याकांसाठीचे कोणतेही नियम न पाळत शाळा चालवत आहेत. या शाळांना आरटीईनुसार २५ टक्के आरक्षण देणेही बंधनकारक नाही. यंदाही शहरातील ३ शाळांनी अल्पसंख्यांचा दर्जा मिळविल्यामुळे आरटीईसाठी शाळांची नोंदणी कमी होताना दिसत आहे. दरवर्षी शाळांनी अल्पसंख्यांकचा दर्जा मिळवून आरटीईतून पळवाट काढली तर नोंदणी करणाऱ्या शाळांचा आकडा दरवर्षी कमी होण्याची शक्यता आहे.
आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी २० फेब्रुवारीपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ सुरू होण्याची पालक वाट पाहत आहेत.