- मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलून अपक्ष उमेदवाराला समर्थन..
- भाजपला महाविकास नव्हे तर अपक्ष उमेदवारच थांबवू शकतो; पत्रकाद्वारे भूमिका जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- वंचित बहुजन आघाडीने चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाली आहे, असे असताना वंचितने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा न देता अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठींबा दिल्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे याचा फटका निश्चितच महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना बसू शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसंदर्भात चर्चा झाली.
पिंपरी चिंचवड मध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. आणि त्यांनी १ लाख १२ हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.
गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून बीजेपीला पिपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.
कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा असे विनंती पत्र आलेले नाही आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.
पहाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीजेपी बरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही, असे या पत्रात रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे.


















