- अन्यथा शासनाकडून कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने स्वतंत्र परिपत्रक निर्गमित केले आहे.
आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील २१५-कसबा पेठ आणि २०५ चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणूकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे की, निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना, ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.
यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी परिपत्रकात नमूद केलेल्या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, अशा आस्थापनांविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
















