- आज होणाऱ्या बोलीकडे खिळल्या सर्वांच्या नजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- मोशी गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव परंपरेने महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. १९) उत्साहात संपन्न झाला. शेकडो भाविकांनी यावेळी भंडाऱ्यात शेकभाजी, बुंदी या परंपरागत महाप्रसादाचा लाभ घेतला. आमराई मैदानात भाविकांच्या लांबच लांब बसलेल्या पंगती विलोभनीय दिसून येत होत्या.
महाशिवरात्रीनंतर मोशी यात्रेस सुरुवात होते. सर्वप्रथम भंडारा उत्सव, उरूस, लिलाव, आखाडा असे स्वरूप असते. शनिवार पासूनच भाविकांनी मंदिर परिसर व आमराईतील नंदादीप परिसरात गर्दी केली होती. यात्रा कालावधीमध्ये गावातील शिवाजी महाराज प्रवेशद्वार, मंदिरे, शाळा इमारतीवरील करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत होती. शहर परिसर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेकडो भाविकांनी दरवर्षीप्रमाणे भंडारा उत्सवामध्ये सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
भंडाऱ्याच्या दिवशी ग्रामस्थांकडून बुंदी व शेकभाजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आमराईमध्ये होम, हवन, महापूजा, आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक भक्तांची वर्दळ सुरु होती. सायंकाळ नंतर भाविकांच्या पंगती बसून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पोलिसांच्या वतीने यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आधुनिकिकरणाच्या रेट्यात देखील मोशीकरांनी आपली परंपरा जपली असून भंडारा उत्सवाला भाविकांचा प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. भंडारा उत्सवानंतर होणारा लिलाव, यात्रा, आखाडा याला देखील भाविकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल असे चित्र आहे.
नागेश्वर महाराज मंदिरात आज सोमवारी नागेश्वर महाराज यात्रा उत्सवात पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला लिलाव सोमवारी सकाळी पार पडणार असून यंदा सर्वधिक बोली लावत महाराजांच्या भंडाऱ्यात अर्पण झालेल्या वस्तू कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.












