न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. गेल्या तीन पंचवार्षिक या मतदारसंघामध्ये मराठा नेतृत्व होते. तर आताही मराठा मतदार जास्त असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीने मराठा उमेदवार दिले आहेत. मात्र, या मतदारसंघामध्ये मराठ्यांइतकेच इतर मागासवर्गीय (ओबीसी) आहेत. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघावर मराठा की ओबीसींचे वर्चस्व असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या मतदारसंघामध्ये ओबीसी, मराठा, कुणबी या मतदारांची संख्या अधिक आहे. एकूण मतदारांच्या संख्येपैकी मराठा व कुणबी २६.७० टक्के म्हणजेच १ लाख ५१ हजार २३३ इतकी मतदारसंख्या आहे. त्यांच्याहून एक टक्का कमी इतर मागासवर्गीय (ओबीसी) हे २०.७५ टक्के म्हणजेच १ लाख ४५ हजार ८०२ इतके आहेत. एकूण मतदारांपैकी अधिक मतदार हे मराठा, कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये
मराठा, कुणबी व इतर मागासवर्गीय यांचे वर्चस्व असल्याची चर्चा सुरु आहे.
तर, मुस्लीम, ब्राह्मण, अनुसूचित जाती, जमाती यांचेही मत निर्णायक ठरणार आहे. मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती (एससी) मतदार ७७ हजार ३२ आहेत. तर अनुसूचित जमाती (एसटी) १९ हजार ८२५ आहेत. तसेच मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १५.८० टक्के असून, ते ८९ हजार ४९४ इतके आहेत. तर ३४ हजार ८३४ ब्राह्मण संख्या आहे. याव्यतिरिक्त जैन, ख्रिश्चन हे ४८ हजार १४५ आहेत, सर्वाधिक मतदार संख्या ही मराठा आणि ओबीसींची आहे. त्यामुळे मराठा, ओबीसी मतदार कोणाला कौल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












