- अपक्ष उमेदवार राहुल कलाटे पिछाडीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी दि. २० फेब्रुवारी रोजी निवडणुक निर्णय अधिकारी, २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, “ग” क्षेत्रीय कार्यालय, ३रा मजला, थेरगाव, येथे पार पडली.
प्रमुख उमेदवारांमध्ये पहिल्या टप्यात भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ४,९७,९१७ तर दुसऱ्या टप्प्यात १५,६१,७८५ रुपयांचा खर्च आयोगाला सादर केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी पहिल्या टप्प्यात ४,७४,७४० तर दुसऱ्या टप्प्यात २१,४६,९३३ रुपयांचा खर्च आयोगाला सादर केला आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी पहिल्या टप्यात १,१३,९०२ तर दुसऱ्या टप्प्यात १२,००,३९७ रुपयांचा खर्च आयोगाला सादर केला आहे. तर इतर अपक्षांचा खर्च दोन्ही टप्प्यात लाखाच्या आताच आहे.
भारत निवडणुक आयोग यांचे कार्यालय, निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक तपासणी केली जात आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला असून, उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे. दरम्यान, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली दि. १५ फेब्रुवारी रोजी तर दुसरी तपासणी आज पार पडली आहे. तिसरी तपासणी दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
उमेदवारांच्या खर्चाची पहिली आणि दुसरी तपासणी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात आली असून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. पुढील तिसऱ्या तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सर्व उमेदवारांना दिल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून संकल्प सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी अनुषंगाने माहिती घेत असून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च तपासणी कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत.
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये इतकी आहे. मतदार संघामध्ये एकूण २८ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. लेखाधिकारी इलाही शेख आणि त्यांच्या पथकाकडून हे काम केले जात असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक म्हणून आयकर अधिकारी प्रकाश हजारे यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सचिन ढोले यांनी सांगितले.












