न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- आयआयबीएम कॉलेजमध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शेकडो विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभागी होऊन शिवजयंती उत्साहात साजरी केली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवव्याख्याते चंद्रकांत सूर्यवंशी, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड. जितू यादव, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, संचालिका सौ. शितलताई वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, कॉलेज विभागप्रमुख अमोल भागवत, प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ आणि सर्व शिक्षकवृंद यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून शिवमूर्तीची मानवंदना केली.
या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये किल्ला प्रदर्शन केले. तसेच शिववेशभूषा, नृत्य, शिवभाषन, पोवाडा इत्यादी सादर करून वातावरण शिवमय केले. शिवव्याख्याते सूर्यवंशी यांच्या प्रभावी भाषणाने या उत्सवाची शोभा वाढली.
संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर सरांनी शिवाजी महाराजांनी मावळे कसे घडवले आणि जी शिकवण जगाला दिली, त्याबद्दल विद्यार्थ्याना सखोल मार्गदर्शन केले.
प्राचार्य प्रदीप फुलकर आणि विभागप्रमुख अमोल भागवत यांनी शिवाजी महाराजांनी जसे महाराष्ट्रात आपले वर्चस्व गाजवून मुघलांकडून किल्ले जिंकून स्वराज्याची स्थापना केली तसेच विद्यार्थ्यानीही आपल्या व्यक्तिमत्त्वावर परदेशातही आपले करिअर बनवावे असे मार्गदर्शन केले. प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ यांनी जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना शिकवण दिली आणि समाजात आपण एक स्त्री म्हणून कसे वावरले पाहिजे व आपल्या हिमतीवर कसे जगावे याबद्दल संदेश दिला.
ढोल ताशांच्या गजरात कॉलेजमधून चिखलीपर्यंत शिवाजी महाराजांची मिरवणूक काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन अनिकेत वंजारी व संदीप जाधव आणि सर्व शिक्षकवृंद यांनी तर, प्राचार्य प्रदीप फुलकर यांनी आभार मानले.