न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत नुकतीच शहर शिवसेनेतून (ठाकरे गट) आठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष मा. आ. गौतम चाबूकस्वार यांनी हे आदेश काढले. दरम्यान याबाबत पक्षाने नव्याने आदेश काढत गैरसमजुतीतून ही हकालपट्टी झाल्याचे मान्य करीत दिलगिरी व्यक्त केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिंचवड विधानसभा संघटक अनिता तुतारे, उपशहर संघटक रजनी वाघ, विभाग संघटक शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा संघटक गणेश आहेर, रवी घाटकर यांचा यात समावेश होता.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व पदाधिकारी हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच असून, त्यांना दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील, अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे दिली आहे.












