न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार नाना काटे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळे गुरव ते जुनी सांगवी या भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. रॅली सुरु असताना अनेक नागरिकांनी अजित पवार आणि उमेदवार नाना काटे यांना भेटून चिंचवडच्या विकासासाठी नाना काटे यांनाच साथ देणार, अशा भावना व्यक्त केल्या. ‘
आमच्या सोसायटीचे प्रश्न रखडलेले आहेत. कचर्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. पाणी टंचाई कधी नव्हे, इतकी तीव्र झाली आहे. या सार्या समस्यांना भारतीय जनता पक्षाचा अंधाधुंद कारभार कारणीभूत आहे. दादा, तुम्ही नेतृत्व करत होतात त्या काळात जनतेचे हाल कधी झाले नाहीत. आम्ही भाजपला संधी देऊन खूप मोठी चूक केली. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराची धुरा राष्ट्रवादीच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही चिंचवडपासूनच परिवर्तनाला सुरुवात करू’, असा निश्चय मतदारांनीच बोलून दाखविला. अजित पवार यांनीही मतदारांना दिलासा दिला.















