न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवधे काही तास शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे अर्थपूर्ण हालचालींना वेग येत असल्याचे चित्र सध्या मतदार संघात पहावयास मिळत आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ उमेदवार आहेत. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील नेत्यांसह देशातील नेत्यांनीही सभा गाजविल्या. त्यामुळे मतदार बाजूला पक्षांचे कार्यकर्तेच चार्ज झाल्याचे पहावयास मिळाले.
तसे पाहता चिंचवड मतदारसंघात गावकी आणि भावकीचे राजकारण मोठे आहे. त्यामुळे स्थानिक नेते मंडळी पक्ष कोणताही असो राजकारण आपल्याच सोयीच करतात हा आजवरचा अनुभव आहे. दिवसा पक्षाच्या व्यासपीठावर आणि रात्री गावकी, भावकी आणि सोयरे मंडळीत मिसळणाऱ्या या स्थानिक राजकीय नेते मंडळींचा कल जाणून घेणं तसं अवघडच आहे.
उद्या रविवारी (दि. २६) मतदान होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले जात आहे. आपल्या पक्षाला कोणत्या परिसरातून किती मतदान मिळणार आहे, त्यानुसार मतांचा रेट फुटला आहे. मताला पाचशे ते दोन हजार रुपयांचे लक्ष्मीदर्शन होत आहे, अशी सर्वत्रच चर्चा आहे. यंदाच्या निवडणुकीत कूकर, मिक्सर, गॅस शेगडी वाटपाचा नवा फंडा समोर येत आहे. मतदान जसे जवळ येईल तसे हा भाव वधारू शकतो. त्यामुळे निवडणूक विभागासह पोलीस यंत्रणा हे आव्हान कशा प्रकारे थोपवितात यावरच मतदानाची टक्केवारी अवलंबून आहे.












