- स्पर्धेत ४०० बैलगाड्यांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये पहिल्या दिवशी विकास अंकुश नाईकवाडे यांचा गाडा पहिला आला, तर दुसऱ्या दिवशी सदाशिव महिपती लाडंगे यांचा गाडा पहिला आला. या स्पर्धेत ४०० बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी बारा लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते. यापैकी ११ दुचाकी देण्यात आल्या. उर्वरित रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली.
या स्पर्धेत ५९ गाड्यांनी पहिला क्रमांक पटकाविला. त्यांना एक लाख ५१ हजार रुपयांचा इनाम विभागून देण्यात आले. या स्पर्धेत पहिल्या दिवशी फळी फोड विकास अंकुश नायकवाडी यांच्या बैलगाड्याने केल्याने त्यांना व दुसऱ्या दिवशी सदाशिव महिपती लांडगे यांनी फळीफोड केल्याने त्यांना १५ हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. दुसऱ्या क्रमांकात ११० गाड्यांचा समावेश होता. या गाडीमालकांना एक लाख एक हजार रुपयांचे इनाम विभागून देण्यात आले. तृतीय क्रमांकांत ६० गाड्यांचा समावेश होता.
या स्पर्धा दोन दिवस घेण्यात आल्या होत्या. या शिवाय चार सोन्याच्या अंगठ्या, एलसीडी टीव्ही व सायकली बक्षिसे देण्यात आल्या. पहिल्या दिवशी घाटाचा राजा किताब अंकुश कोंडीबा मळेकर यांच्या गाड्याने पटकाविला तर दुसऱ्या दिवशी राजू वसंत जवळेकर यांच्या गाड्याने पटकाविला. स्पर्धेचे आयोजन जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा समिती व श्री संत तुकाराम महाराज बैलगाडा संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.












