न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२३) :- बोगस परवाने घेणा-या शाळांचे बिंग फुटल्यानंतर महापालिकेतील शिक्षण विभागाकडून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व शिक्षण संस्थाचालकांकडून सर्व आवश्यक कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. ४२ सीबीएसई शाळांनी कागदपत्रांच्या फाइल्स जमा केल्या असून त्याची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून या फाइल्स राज्याच्या शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविल्या आहेत. तपासणीत बोगस कागदपत्रे आढळल्यास संबंधित शाळेवर कडक कारवाई केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये इंग्रजी माध्यमाची (सीबीएसई) एक आणि पुण्यात दोन शाळा बोगस प्रमाणपत्राच्या आधारे चालविल्या जात असल्याची माहिती उजेडात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून शहरातील सर्व सीबीएसई बोर्डाच्या शाळा प्रमाणपत्रांच्या फाइल्स संकलित करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची माहिती संकलित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दहा दिवसांत तब्बल ४२ शाळांची कागदोपत्री माहिती गोळा करण्यात आली.
या फाइल्स राज्याचे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. शाळा सुरू करताना संबंधित संस्थाचालकाने राज्य शासनाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी जी कागदपत्रे सरकारकडे जमा केली होती. ती कागदपत्रे आणि नुकत्या संकलित केलेल्या फाइल्सची एकत्रित तपासणी केली जाणार आहे. तपासणीत तफावत अथवा बोगस कागदपत्रे आढळून आल्यास संबंधित शाळेवर कारवाई केली जाणार आहे. कदाचित त्या शाळेचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो.
आदेशाची पायमल्ली
बोगस प्रमाणपत्रांची माहिती समोर आल्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या सर्व शाळांना परवानगी प्रमाणपत्र शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सर्व शिक्षण संस्थांना तसे आदेश देण्यात आले होते. मात्र, आज घडीला काही शाळांनी प्रवेशद्वारावर परवानगी प्रमाणपत्र लावल्याचे दिसत नाही. त्यामुळे पालकांच्या मनामध्ये पुन्हा बोगस शाळेबाबत संशय निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे शिक्षण विभागाने आदेश काढून देखील शाळा व्यवस्थापनाकडून त्याचे पालन केले जात नाही.