न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२३) :- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामे तयार केली जाणार आहेत. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि मुंबईसह राज्यात चौदा जिल्ह्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफायएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन गोदामे बांधण्यात येणार आहेत. पुण्यातील २१ मतदारसंघांच्या गोदामासाठी रावेत येथे पीएमआरडीएच्या सात एकर जागेवर गोदामाचे काम सुरू केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय यंत्र साठवण्यासाठी गोदामे असावीत, असे निर्देश राज्यांना दिले आहेत. यंत्रे साठवण्यासाठी आतापर्यंत भाडेतत्वावर गोदामे घेण्यात येत होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होत होता. पुण्यातील गोदामासाठी सुरुवातीला येरवडा येथील दोन एकर जागेचा विचार करण्यात आला. मात्र ही जागा वेळेत ताब्यात आली नाही. रावेत येथील पीएमआरडीएच्या जागेत सुमारे सात एकर मोकळी जागा मिळाली. राज्य सरकारकडून ही जागा मिळावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रयत्न केले. या जागेवर यंत्र साठविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व मतमोजणीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.
इव्हीएम मशीनमध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट यांच्यासह व्हीव्हीपॅटचा समावेश होतो. पहिल्या भागात याची साठवण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. येथे एकाच वेळी ११ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी करता येणार आहे. याच ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणही घेता येणार आहे. सुमारे ५१ कोटी खर्चाला मंजुरी मिळाली असून त्यापैकी पाच कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
हे गोदाम दिल्लीच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. या गोदामामध्ये मतमोजणीवेळी करण्यात येणाऱ्या बेरिकेडचीदेखील व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या वेळी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करून बेरिकेड्स उभारावे लागणार नाहीत. त्याठिकाणी गाड्यांच्या पार्किंगची सोय असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे गोदाम बांधण्यात येणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.












