- मतमोजणी पूर्ण होऊन निकाल घोषित व्हायला रात्र उजाडणार..
- पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे निलख, नवी सांगवी व सांगवीची पेटी सर्वात शेवटी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) रोजी मतदान झाले. २८ उमेदवारांना एकूण २ लाख ८७ हजार ४७९ इतके मतदान झाले आहे. हे प्रमाण ५०.५३ टक्के इतके आहे. मतमोजणी उद्या गुरुवारी (दि. २) सकाळी आठला सुरू होणार आहे. थेरगावच्या शंकर आण्णा गावडे कामगार भवनातुन निकाल घोषित होणार आहे. मतमोजणीच्या सर्व ३७ फेऱ्या पूर्ण होण्यास रात्री आठ वाजणार आहेत. त्यामुळे दिवंगत आ. लक्ष्मणभाऊ जगताप यांचा खरा उत्तराधिकारी कळायला रात्र उजाडणार आहे.
चिंचवड मतदारसंघात एकूण ५१० मतदान केंद्र आहेत. एकूण ५१० ईव्हीएम मशिन मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर ५१० पैकी कोणत्याही पाच व्हीव्हीपॅट मशिनमधील चिट्ट्यांची मोजणी केली जाते. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे. एका फेरीसाठी ३० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. तसेच, पिंपळे गुरव, सांगवी व सांगवीच्या ११७ नवी ईव्हीएममधील मतांची मोजणी शेवटी होणार आहे. त्यामुळे निकाल स्पष्ट होण्यासाठी रात्री उशिरापर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एका फेरीतील १४ टेबलवरील मोजणी पूर्ण होण्यास तसेच, सांख्यिकी नोंदणी करण्यास किमान ३० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. नंतरच्या फेऱ्यात हा कालावधी फेरीनिहाय ५ ते १० मिनिटाने कमी होऊ शकतो. त्यानुसार, सर्व ३७ फेऱ्या पूर्ण होण्यास रात्रीचे आठ वाजणार आहेत. त्यानंतर सर्व नोंदी पूर्ण करून भारत निवडणूक आयोगाकडे निकाल मेल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले हे विजयी उमेदवाराचे नाव घोषित करतील. त्यास किमान रात्रीचे दहा ते अकरा वाजू शकतात.
मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत येथील केंद्रांवरील ईव्हीएम मशिनवरील मतांची मोजणी प्रथम केली जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे निलख, नवी सांगवी व सांगवी असा उतरता क्रम आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना मानणारा तसेच, भाजपकडे झुकलेला सर्वांधिक मतदार पिंपळे गुरव, नवी सांगवी व सांगवी या भागांत आहे. येथील केंद्रांवरील ईव्हीएमची मोजणी अखेरीस होणार आहे.
















