न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे. महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे.
पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.
कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या होत्या. २००९ मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपाविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
“कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रणा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी देत आपला पराभव मान्य केला आहे.